मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू.....
पन्हाळा तालुक्यातील केखले येथील संभाजी बाबू कोलूले पाटील ( वय ६५ ) या शेतकऱ्याचा ऊसातील वैरण काढताना मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.तर दोघेजण जखमी आहेत.एकावर कोडोली शासकीय उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मधमाश्यांच्या हल्यात मृत्यूमुखी झालेले संभाजी कोलूले पाटील हे सोमवारी (दि ९) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास केखले(ता.पन्हाळा) येथील पाझर तलावा शेजारी असणाऱ्या तराळकी वस्ती या शिवारात आपल्या ऊसातील शेतात उसाच्या पाल्याची वैरण काढत असताना अचानक आलेल्या मधमाशांच्या थव्याने संभाजी कोलुले या शेतकऱ्यावर हल्ला चढवला या मधमाशांच्या हल्ल्यात मधमाशांनी तोंडावर गळ्यावर हातापायावर प्रचंड चावा घेतल्याने होत असलेल्या वेदनामुळे आक्रोश करत ऊसाबाहेर आले तरीसुद्धा मधमाश्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नव्हता.मधमाश्यांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी गेलेले त्यांचा मुलगा युवराज संभाजी कोलूले पाटील (वय ३४) आणि भाऊ लक्ष्मण बाबू कोलूले पाटील यांना देखील काही मधमाश्यांनी चावा घेतला. मधमाश्यांच्या हल्याचे शिकार बनलेले संभाजी कोलूले हे गंभीर जखमी झाल्यामुळे बेशुद्ध पडले होते त्यांना घोंगड्यात लपेटून उपचारासाठी कोडोली येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात नेले असताना उपचारापुर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.संभाजी कोलूले हे वारणा दुध संघाचे निवृत्त कर्मचारी होते.
मधमाश्यांच्या हल्यात जखमी झालेले युवराज संभाजी कोलूले पाटील आणि लक्ष्मण बाळू कोलूले पाटील या दोघांपैकी युवराज कोलूले यांना गळ्यावर आणि हातापायावर मधमाश्यांनी चावा घेतल्याने त्यांचेवर कोडोली येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.