वारणा शिक्षण संकूलास राज्य शासनाकडून "वारणा विद्यापीठ" म्हणून मान्यता
--- - - - - - - - - - - - - - -
शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावलौकीक मिळविलेल्या वारणा विभाग शिक्षण मंडळास "वारणा विद्यापीठ" म्हणून राज्य शासनाने आज मंजूरी दिली. राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
"वारणा विद्यापीठ" म्हणून मान्यता मिळाली याबाबतची माहिती समजताच वारणा परिसरांतूंन अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी १९५० च्या दशकात वारणा साखर कारखान्याच्या माध्यमातून वारणा समूहाची मुहुर्तमेढ रोवली. आणि वारणा उद्योग व शिक्षण समूहाची आंतरराष्ट्रीय किर्तीचा समूह म्हणून ओळख निर्माण झाली. वारणा शिक्षण मंडळात केजीपासून ते उच्च शिक्षणांपर्यंतची सर्व शैक्षणिक सुविधा वारणा शिक्षण संकुलात आहेत. हे संकुल वारणा विद्यापीठ व्हावे यासाठी वारणेने हा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला होता. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला.
वारणा पंचक्रोशीतील सर्वसामान्य व छोट्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा शिक्षण समूहाची वाटचाल सुरु आहे. आता वारणा विद्यापीठास मान्यता मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात नवी सुरुवात झाली आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना अपेक्षित नवा माणूस घडवण्याचा मूळ विचार विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठेवला आहे असल्याचे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही व्ही कार्जीनी यांनी सांगितले.
वारणा विद्यापीठास मंजूरी मिळाल्याची माहिती समजताच आमदार विनय कोरे यांच्या अभिनंदनासह वारणा परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.