‘गुलकंद’ चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित – समीर चौघुले आणि ईशा डे यांची पत्रकार परिषदेत माहिती
कोल्हापूर : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड
प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते समीर चौघुले आणि अभिनेत्री ईशा डे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि चित्रपटाबाबतची माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना समीर चौघुले म्हणाले, “‘गुलकंद’ हा हलकाफुलका कौटुंबिक चित्रपट असून, त्यामध्ये विनोद, भावना आणि नात्यांची गोड गुंफण आहे. प्रेक्षकांना प्रत्येक पात्र आपल्यासारखंच वाटेल.” तर ईशा डे म्हणाल्या, “या चित्रपटात प्रेम वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे. प्रत्येक वयोगटासाठी हा चित्रपट तितकाच खास ठरेल.”. चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या संवादाने कथानकातील वेगळेपणा स्पष्ट केला आहे. दोन कुटुंबं – ढवळे आणि माने – यांच्या भेटीतून उभं राहणारं एक वेगळं नातं, त्यातून उडणारा गोंधळ आणि त्याचा गोडवा प्रेक्षकांना हसवतही आणि विचार करायलाही लावणार आहे. चित्रपटातील ‘चंचल’ आणि ‘चल जाऊ डेटवर’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, त्यांचे बोल, संगीत आणि सादरीकरण यांना रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सांगितलं, “गुलकंद म्हणजे नात्यांमधील गोडवा. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी असून, त्यात भावनांचा आणि हास्याचा समतोल आहे.”