*मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध*
लेझर लाईटचा वापर टाळण्याचे सर्व गणेश उत्सव मंडळांना प्रशासनाकडून आवाहन
कोल्हापूर :- दि. १२ : दिनांक ७ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या काळात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. लेझरमुळे डोळ्यांना इजा पोहचत असल्याने मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक १२ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळाकडून मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापरास प्रतिबंध केले आहे. या आदेशाचे सर्व मंडळांनी पालन करावे असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहणार आहेत.