हेरले येथे 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अंतर्गत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
हेरले (ता. हातकणंगले) येथील कै. वालुबाई भ्र. मगनचंद शहा सार्वजनिक वाचनालय व कै. दिपक पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वाचन संस्कृती वाढविण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून हे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
या ग्रंथप्रदर्शनास हेरले गावातील कौतुक विद्यालय, शाळा नं. 2, केंद्र शाळा, कन्या विद्या मंदिर व हेरले हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, वाचक सभासद व इतर वाचकांनीही सहभाग घेतला.
ग्रंथप्रदर्शनाचे वैशिष्ट्य
प्रदर्शनामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, बालविभागातील साहित्य, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, धार्मिक ग्रंथ, तसेच स्थानिक लेखिका सुमन किराणे यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले.
'लेखक आपल्या भेटीला' उपक्रम
'लेखक आपल्या भेटीला' या विशेष उपक्रमांतर्गत स्थानिक लेखिका सुमन किराणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांची मुलाखत श्रीकांत पाटील यांनी घेतली त्यामध्ये त्यांनी आपल्या साहित्याची माहिती सांगताना त्यांच्या लिखाणातील प्रेरणा, विचारप्रवाह आणि साहित्य निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला. या संवादामुळे विद्यार्थ्यांना लेखनाच्या नव्या दृष्टीकोनाची ओळख झाली.
कार्यक्रमाचे मान्यवर व त्यांचे मार्गदर्शन
कै. दिपक पाटील वाचनालयाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील, वालुबाई शहा वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. अश्विनी परमाज आणि लिपिक सौ. प्रिया माळी यांनी विद्यार्थ्यांना वाचन व ग्रंथप्रेमाबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कै. वालुबाई भ्र. मगनचंद शहा वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सातलिंग तोडकर, उपाध्यक्ष श्री. ए. बी. चौगुले, सचिव श्री. बी. बी. कराळे, श्री. एन. एस. पाटील, श्रीकांत पाटील, सचिन भोसले, शांतीनाथ आलमान, शैलेश कुंभार, काशीनाथ स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचन संस्कृती वाढीसाठी उपयुक्त प्रयत्न
सदर ग्रंथप्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली असून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अशा उपक्रमांचा विशेष उपयोग होणार आहे, असे सर्व उपस्थितांनी मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम हेरले येथील जैन मंदिर हाँल येथे पार पडला.