शिवजयंतीनिमित्त ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्यास परवानगी
कोल्हापूर, दि. 18 : जिल्ह्यात दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5(3) नुसार, ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृह, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सन 2025 मध्ये ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्यास अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी परवानगी दिली आहे.
ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापराबाबत ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करण्याकरिता सुटीचे दिवस यापूर्वी जाहिर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध शिवजयंती मंडळांनी प्रत्यक्ष भेटून केलेल्या विनंतीनुसार, निवेदनानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक रात्री 12 पर्यंत वापरण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केलेली होती.
यापूर्वी 2025 सालासाठी दिनांक 17 जानेवारी 2025 च्या आदेशामधील ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतचे सुटीचे दिवस घोषित करण्यात आले आहेत त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.