माणुसकीचा देवदूत: स्वप्निल यांची प्रेरणादायी सेवा
हातकणंगले :
माणुसकीच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या स्वप्निल यांनी 2005 पासून आजपर्यंत असंख्य चांगले आणि वाईट अनुभव गाठीशी घेतले आहेत. त्यांच्या अथक सेवेमुळे हजारो जीवांना संजीवनी मिळाली, आणि हजारो मृतांना सन्मानपूर्वक अंतिम संस्कार प्राप्त झाले.
अपघाताची बातमी मिळताच काही क्षणांत घटनास्थळी पोहोचणारे आणि गरजूंना मदतीचा हात देणारे स्वप्निल यांनी आतापर्यंत 9000 हून अधिक पोस्टमार्टम केले आणि 1800 हून अधिक अपघातग्रस्तांना जीवदान दिले आहे. त्यांच्या वेगवान व तातडीच्या मदतीमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
समाजाने दुर्लक्षित केलेल्या 200 हून अधिक बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करून त्यांनी मृतांना आदराने निरोप दिला. कोरोना महामारीतही त्यांनी 200 मृतांचे अंत्यसंस्कार केले आणि अनेक कोरोना बाधितांना जीवनदान दिले.
फक्त मानवांसाठीच नव्हे, तर प्राणीमात्रांसाठीही त्यांनी अपार सेवा दिली आहे. 4000 हून अधिक सापांचे प्राण वाचवून त्यांनी पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
स्वप्निल यांच्या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्था, नागरिक, समाजसेवक आणि पत्रकारांनी त्यांचा गौरव केला. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. काही लोकप्रतिनिधींनी त्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अद्याप यश लाभले नाही.
जीवनाने त्यांना खूप काही शिकवले, अनेक संघर्षांना सामोरे जात आजही ते समाजसेवेत कार्यरत आहेत. माणुसकीच्या या ज्योतीचा प्रकाश असाच अखंडतेने तेवत राहो,