आदर्श प्रशालेत जागतिक चिमणी दिन, वन दिन व जल दिन साजरा
कोल्हापूर :- आदर्श प्रशालेत 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन, 21 मार्च रोजी जागतिक वन दिन आणि 22 मार्च रोजी जागतिक जल दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्ताने निसर्गमित्र श्री. अनिल चौगुले यांनी विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. आर. वाय. पाटील यांनी अनिल चौगुले यांचे स्वागत केले. यावेळी श्री. ए. के. देसाई, श्री. डी. पी. सुतार, श्री. आर. बी. माने, सौ. एस. एस. शिंदे, सौ. ओतारी मॅडम, श्रीमती सीजा बालन, सौ. पल्लवी शिंदे आणि श्री. मोमीन सर उपस्थित होते.
श्री. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना चिमण्यांचे संरक्षण, वृक्षसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरणपूरक सवयी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी चिमण्यांच्या संवर्धनासाठी घरगुती सवयी बदलण्याचे महत्त्व सांगितले. वृक्षसंवर्धनासाठी फळांच्या बिया पेरण्याचे आणि अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन केले. तसेच पाणी बचतीसाठी गाड्या धुण्यासाठी कमी पाणी वापरण्याचा सल्ला दिला.
रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी निसर्गसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला.