बाईक चोरांच्या आवळल्या मुसक्या
चोरीच्या ९ मोटारसायकल जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश
कोल्हापूर १३ मार्च
प्रतिनिधी / यश रुकडीकर
महावीर अण्णा आवटी हे सांगलीचे रहिवासी दि.६ रोजी एचएफ डिलक्स ( एमएच10-सिटी-1856) ही दुचाकी घेऊन कोल्हापुरात आले होते.त्यांनी परिख पुलाजवळ आपली दुचाकी उभी करून ते मित्राच्या गाडीवरून शेतात फवारणी करण्याचे औषध घ्यायला शाहूपुरी येथे गेले.औषध घेऊन परत आल्यावर त्यांची दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले.आपली दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शाहूपुरी पोलीस ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की दि.९ रोजी दुपारी २ वाजता दोन इसम चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी खानविलकर पेट्रोल पंपाच्या शेजारील १०० फुटी रोडवर येणार आहेत.पोलिसांनी वेषांतर करून सदर ठिकाणी सापळा रचला असता दोन इसम विना नंबरप्लेट मोटारसायकल घेऊन येताना दिसले.पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली.ह्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपली नावे १)शरद सुभाष टोमके,वय २२, रा.साठे नगर,वाळवा,सांगली व २)विशाल मधुकर चव्हाण,वय २२ , बागणी,सांगली असून सदर मोटारसायकल रेल्वे फाटक येथून चोरी केल्याचे कबुल केले.त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कासेगाव,आष्टा,करवीर,शिरोली एमआयडीसी,कोल्हापूर,शाहूपुरी येथून ९ मोटारसायकल चोरल्याचे सांगितले.सदर इसमांकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई शहपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके,सहा.फौजदार संदिप जाधव,मिलिंद बांगर,सुशील गायकवाड, सनीराज पाटील व इतर सहकाऱ्यांनी केली आहे.