महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याला सहा मानाचे बाल स्नेही पुरस्कार
महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारला पुरस्कार
कोल्हापूर, दि. ०३ : पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष कोल्हापूर, कागल एज्युकेशन सोसायटी संच मुलाचे निरीक्षणगृह कागल, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संच शिशुगृह कोल्हापूर यांना या वर्षीचे बाल हक्क संरक्षण आयोग, वरळी मुंबई यांचे कडून देण्यात येणारे एकुण सहा मानाचे बाल स्नेही पुरस्कार मिळाले.
या पुरस्कारांचे वितरण आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सूसीबेन शहा, राज्यमंत्री महिला बाल विकास मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री गृहनिर्माण शालेय शिक्षण पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थित सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान केले जातात. हे पुरस्कार बालकांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षा, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांना दिले जातात.
आयोगाने ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बाल स्नेही पुरस्कार’ हे उपक्रम राबवून बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘बाल स्नेही पुरस्कार २०२४’ सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये बाल हक्कांच्या संरक्षणासाठी भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, सर्व विभाग प्रमुख, महिला व बाल विकास विभाग व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा आहे असे प्रतिपादन पुरस्कार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.