हेरले (ता. हातकणंगले) : काळाच्या प्रवाहात एकमेकांपासून दूर गेलेल्या, पण हृदयात कायमसाठी घर करून बसलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हेरले हायस्कूल, हेरले येथील इ. १० वी बॅच १९८४-८५ चे विद्यार्थी तब्बल ४० वर्षांनंतर एकत्र आले आणि हॉटेल वीर रत्न येथे त्यांच्या स्नेहसंमेलनाचे अनोखे पर्व उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. डांगे होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गुरुवंदनेने झाली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या चरणी पुष्पांजली वाहून, मनःपूर्वक स्वागत करत त्यांचा सत्कार केला. यावेळी पी. एम. चौगुले यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे मनोगत मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच, बॅचमधील काही सहाध्यायांचे दुर्दैवाने निधन झाल्याची भावना सर्वांच्या मनाला भिडली. त्याचबरोबर सध्या देशासाठी झुंज देताना युद्धात शहीद झालेल्या जवानांचीही आठवण काढत, उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. हा क्षण अत्यंत भावनिक आणि अंतर्मुख करणारा ठरला.
शिक्षकांचा सत्कार हा कार्यक्रमाचा आणखी एक भावनांनी भारलेला टप्पा ठरला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना आजही तेवढ्याच आदराने आणि प्रेमाने वाकून नमस्कार करत त्यांच्या शिकवणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी आपल्या आयुष्यातील वाटचालीचा परिचय देताना, शाळेतील गमतीजमती, शिक्षकांनी दिलेली शिस्त, शिकवण आणि त्या आठवणींमधील हसरे-रडवे क्षण शेअर केले.
यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना नम्रतेने सांगितले की, "शिक्षकांनी दिलेल्या शिदोरीवरच आजवरच्या जीवनप्रवासात आम्ही इतके पुढे आलो आहोत."
अलका माळी यांनी उपस्थित सर्वांचे विशेष आभार मानले, आणि त्या आभारप्रदर्शनातही एक भावनिक लहर उमटली.
पहिल्या सत्रानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संगीत खुर्ची, गाणी, गप्पा आणि हास्यविनोदाने भरलेल्या विविध कार्यक्रमांमुळे वातावरणात उत्साहाची लहर उसळली. जुन्या आठवणींनी मन ओथंबून गेलं.
या स्नेहसंमेलनाची कल्पना आणि संकल्पना मोहम्मद जमादार व मंगल माकने यांच्या पुढाकारातून साकार झाली. त्यांनी जुन्या सहपाठकांचे संपर्क क्रमांक मिळवून, सर्वांशी संपर्क साधून माहिती एकत्र करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय कष्ट घेतले.
त्यांना गौतम कुरणे, नसीर बारगीर, राजगोंडा पाटील, महावीर पाटील, लता कदम, पावलस चौगुले, नेमगोंडा पाटील, लियाकत खतीब, रवींद्र लोकरे सुनील पाटील इत्यादी माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचा समारोप "पुन्हा भेटूया" या आश्वासक शब्दात झाला. डोळ्यांत आनंदाश्रू, मनात समाधान आणि चेहऱ्यावर हसू घेऊन सर्वांनी निरोप घेतला.
ही भेट केवळ एक स्नेहसंमेलन नव्हते, तर काळाच्या पडद्याआड गेलेल्या बालपणीच्या आठवणींना नवसंजीवनी देणारा एक अविस्मरणीय क्षण होता.
या स्नेहसंमेलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, शाळेतील मैत्री ही काळाच्या ओघातही न झणारी एक अमूल्य शिदोरी असते.