अतिग्रे (प्रतिनिधी भरत शिंदे) | हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कलावती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २२ मे २०२५ रोजी सरपंच श्री. सुशांत वड्ड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत त्यांच्या नावावर एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली असल्याची अधिकृत घोषणा निवड समितीचे अध्यक्ष तथा सरपंच श्री. वड्ड यांनी केली.
सौ. कलावती गुरव या इचलकरंजी महानगरपालिकेत २८ वर्षे शिक्षिका तर ४ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या घडामोडींमध्ये मोलाची भूमिका बजावत एक आदर्श शिक्षिका म्हणून लौकिक मिळवला आहे. तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत मुलगा प्रशांत गुरव यांनी माजी सरपंच म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
सन २०२३ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सौ. कलावती गुरव यांना निवडून दिले. आता उपसरपंचपदाच्या माध्यमातून गावाच्या विकासाची सूत्रं त्यांच्या हाती आली आहेत. या निवडीनंतर गावात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळत गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.
या प्रसंगी सदस्य श्री. बाबासो पाटील, अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन पाटील, छाया पाटील, दिपाली पाटील, कल्पना पाटील, अक्काताई शिंदे, वर्षा बिडकर तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुनील खांडेकर, माजी सरपंच सागर पाटील, राजश्री शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्रीधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते