सर्वांनाच सहभागी होता येईल असा गणेशोत्सव आनंदाने साजरा करूया - जिल्हाधिकारी अमोल येडगे
शांतता समितीच्या बैठकीत जिल्हयातील सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन
कोल्हापूर, दि. २९ : गणेश उत्सवाचा उद्देश हा लोकांना एकत्रित आणणे, सामाजिक प्रबोधन करणे, विचारांची देवाण घेवाण करणे असा आहे. घरातील वयस्क, रूग्ण तसेच महिला, बालक अशा सर्वांचाच विचार करून कुटुंबातील प्रत्येकाला सहभागी होता येईल असा सुरक्षित व आनंदी गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हयातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच शांतता समिती सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मंडाळांनी स्वत:हून एक आचार संहिता ठरवून घ्यावी. मंडळातील सदस्य-पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी पार पाडून उत्सव यशस्वी करावा. लेझर लाईट वापरू नयेत यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. कारण त्यापासून डोळ्यांना इजा होत असते. डॉल्बीबाबतही मा.न्यायालयाच्या सूचनांचे पालन सर्व मंडळांनी करावे. बीभत्स गाणी आणि नृत्य कोणत्याही मंडळांनी वाजवणार व दाखविणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
ते पुढे म्हणाले, उत्सवात आपण मिळूनच एक आदर्श नियमावली तयार करून चुकीच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेवू. छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम, त्यांच्या विचारांनी प्रेरीत असे देखावे, कार्यक्रमांचे आयोजन करून संदेश द्यावा. गणेश उत्सवादरम्यान ईद उत्सवही आहे. या काळात सर्व स्तरावर शांतता सुव्यवस्था राखली जाईल यासाठी विशेष प्रयत्न करून आदर्श निर्माण करावा. पोलीस प्रशासनाला सहकार्य करून त्यांचे काम उत्सव निर्विघ्न पार पाडण्याचे आहे. त्यांना सर्व मंडळांनी दिलेल्या नियमांचे सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
परवानगी बाबत कोणत्याही अडचणी येणार नाहीत - पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावर्षी जिल्हयात साडे आठ हजार सार्वजनिक गणेश मंडळे असणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, परवानगीसाठी अर्ज सादर करताना त्याच ठिकाणी इतर सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जातील. मिरवणुकीमध्ये सर्वांना समान वेळ मिळावा यासाठी प्रत्येक मंडळांनी इतरांचा विचार करून प्रत्येक ठिकाणी आपापल्या वेळेचे नियोजन करून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. चोरी तसेच इतर गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होईल. उत्सवात विहित केलेल्या वेळेत पुर्ण वेळ पोलीसांची गस्त राहणार आहे. सर्व ठिकाणी पेट्रोलींग सतत सुरू असेल अशी माहिती त्यांनी दिली. लोकांना सुरक्षततेची भावना निर्माण होईल असे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मा.उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मानकतत्त्वांची अंमलबजावणी करून ध्वनी व हवेचे प्रदुषण होणार नाही याची काळजी आपण सर्व मिळून घेवू. उत्सवामध्ये एकुण ५ दिवस जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने रात्री १२ वाजेपर्यंत सूट राहणार आहे. इतर वेळी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन आपल्या सर्वांना करणे गरजेचे असणार आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. महिला, बालक, पर्यटक यांनी पुढिल वर्षीही आपल्या उत्सवाला भेट द्यावी असे नियोजन आपण करावे. तसेच त्यांनी यावेळी ईद उत्सवातील निघणाऱ्या २३ मिरवणुका या अनंत चतुर्थीनंतर निघणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, त्यांच्या आयोजकांनी याबाबत पत्र देवून माहिती दिली आहे. त्यांचे प्रशासनाच्या वतीने धन्यवाद देतो.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपस्थित मागण्यांबाबत बोलताना आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील चारही वार्डमधील खड्डे बुजविण्यासाठी स्वनिधीतून दोन कोटी रूपये दिल्याचे सांगितले. उत्सवाच्या आधी येत्या आठ दिवसात सर्व खड्डे बुजविण्याचे काम होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मिरवणुक मार्गावरील झाडांच्या फांद्या, विद्युत तारा याबाबत संबंधित विभागस कळवून मार्गात येणारे अडथळे दूर करू. घरगुती गणपती विसर्जनासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जमा मुर्त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली जाईल, यातून कसल्याही प्रकारची विटंबना होणार नाही असे सांगितले. तसेच उपस्थित सदस्यांनी केलेल्या सूचनांचे पालन येत्या आठ दिवसात महापालिका प्रशासन करेल अशी ग्वाही दिली.