मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्याचे सोमवारी आयोजन
*जिल्ह्यातील 300 युवकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये प्रशिक्षणाची संधी*
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळावा दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, विचारे माळ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्श केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, कोल्हापूर व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखक, लेखापाल, शिपाई, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, प्लंबर, कारपेंटर, शीट मेटल वर्कर, पेंटर, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ॲटो इलेक्ट्रिशियन, मॅसन, ब्लॅक स्मिथ वेल्डर, टायर फिटर, ॲटो मेकॅनिक, शिवणगार, बेंच फिटर, बॉडी फिटर, मोल्डर, वायरमन, अपहोल्सटर, Draughtsman या 300 पदांकरीता बारावी, पदवी, डिप्लोमा व आयटीआयधारक उमेदवारांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान 12 वी साठी 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकासाठी 8 हजार रुपये तसेच पदवी- पदव्युत्तरसाठी 10 हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे.
इच्छुक प्रशिक्षणार्थींसाठी अटी- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आय.टी.आय /पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी असावी. उमेदवारांची आधार नोंदणी असावी तसेच उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड तसेच या कागदपत्रांच्या छायांकित 4 प्रती सोबत घेवून यावे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे वरिष्ठ लिपिक रोहित जाधव, मोबाईल क्रमांक -9545211988 व या कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0231 - 2545677 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.