उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमास प्रोत्साहन देण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 6 : समाजातील असाक्षरता नष्ट करून समाज साक्षर करणे ही देखील एक सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्व मंडळांनी प्रोत्साहन देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) तथा सदस्य सचिव, जिल्हास्तर नियामक परिषद, कार्यकारी समिती (नव भारत साक्षरता कार्यक्रम) अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर, २०२२ व २५ जानेवारी, २०२३ नुसार सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत उल्लास "नव भारत साक्षरता कार्यक्रम" या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन लेखन) व संख्याज्ञान विकसीत करणे हा योजनेचा उददेश आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उपक्रम असून विविध गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवित असतात. अशा कार्यक्रमांचे औचित्य साधून गणेश मंडळे व नवरात्रोत्सव मंडळांच्या माध्यमातून नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) म.रा. पुणे यांच्याकडून प्रचार व प्रसारासाठी गणेशोत्सव,नवरात्र उत्सवात मंडळांना पुढील उपक्रम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमांचे नाव विषय/थीम अनुक्रमे पुढीलप्रमाणे
*बॅनर लावणे*- उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे बॅनर लावणे,
*देखावे बनविणे*- प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, बँक, पोस्ट, एटीएम, ऑनलाईन बँकिग बाबत माहिती, डिजीटल साक्षरता, दैनंदिन जीवनातील गणित, प्रवास व वाहतूक विषयक नियम, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे विविध Appa (उदा. फोन पे, गूगल पे, Land reports, दिनदर्शिका App, विविध बँकिग Apps, LIC App)
*उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमावर आधारित विविध स्पर्धा* – वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा व कथाकथन स्पर्धा.
असाक्षरांना साक्षर करणे - गणेश मंडळांनी आपल्या परिसरातील 50 ते 100 असाक्षरांना शाळांच्या सहकार्याने साक्षर करणे व मंडळ सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करणे.
*नव साक्षरांचा सन्मान* - सन 2023-24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या नव साक्षरांचा सत्कार, सन्मान करणे, नव साक्षरांच्या मुलाखतीचे, मनोगतांचे आयोजन करणे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर,जिल्हास्तर, गटस्तर, शाळास्तर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तालुकास्तरावर नियामक परिषदेचे अध्यक्ष तहसिलदार असून कार्यकारी समितीचे अध्यक्ष पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत. तसेच गटस्तर (तालुकास्तर) समित्यांची कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकात नमूद केली आहे.