कोल्हापुरात ‘मिलेट व फळ महोत्सव २०२५’चे आयोजन
कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी २०२५ – महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने 'मिलेट (तृणधान्य) व फळ महोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. ०१ ते ०५ मार्च २०२५ या कालावधीत व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून 'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्पनेला चालना देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव तर ग्राहकांना तृणधान्ये व फळे रास्त दरात उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटन व प्रमुख मान्यवर
हा महोत्सव दि. ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातून तृणधान्य उत्पादक, बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत. महोत्सवात ४० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा यांसारखी तृणधान्ये तसेच, ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागी बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागी डोसा मिक्स यांसारखी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता येणार आहेत . महोत्सवात मिलेट उत्पादन व आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्याने, महिलांसाठी पाककृती स्पर्धा आणि खरेदीदार-विक्रेते संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ग्राहक व नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.