राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : अनुसुचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2025-26 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहित नमुन्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत दि. 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत "समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे" कार्यालयास सादर करावीत, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्याकडून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असल्याचे श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.